आपला देश पूर्वीपासूनच पुरूषप्रधान देश आहे असे म्हटले जाते. पण आपण जर जुना इतिहास पाहिला तर त्यात वर्णन झालेल्या सर्व पुरुषांचे कार्यच त्यांचे पुरुषत्व सिद्ध करते.
निदर्शनास आणून द्यायचे झाले तर आपल्या इतिहासात कधीही महिलांवर पुरूषी अत्याचाराचे आपल्याच पुरूषांकडून झालेले दाखले पहायला मिळत नाहीत.आणि जर काही प्रकार झाले तर त्यावेळची शासनव्यवस्था किंवा राजेशाही अशा पद्धतीने चालवली जायची की, कोणताही पुरुष महिलांबाबत अत्याचार तर दूरच पण तसे विचारही करताना दहा वेळेस विचार करतील.
काळ बदलत गेला ,सामाजिक परिस्थिती बदलत गेली त्याचप्रमाणे समाजातील महिलांचे स्थान ही बदलत गेले. ‘महात्मा ज्योतिबा फुले’ व ‘सावित्रीबाई फुले’ या दोन व्यक्तींना समाजबदलाचे खूप श्रेय जाते. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे तर समाजात महिलांना ‘चूल आणि मूल’ सोडूनही त्यांचे अस्तित्व आहे याची जणू जाणीवच करून दिली. अगदी त्याचप्रमाणे महिलांनी सुद्धा स्वतःचे समाजातील स्थान निर्माण केले व आपल्या पुरूषप्रधान देशातही त्यांनी स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले.
हळूहळू समाजानेही त्यांचे कार्य, त्यांचे समाजातील स्थान याचा स्वीकार केला व महिलांना समानतेची वागणूक मिळू लागली. समाजात महिलाही पुरूषांच्या बरोबरीने सहभागी होऊन स्वतःला सिद्ध करु लागल्या.
पण अगदी अलीकडच्या काळात जर आपण पाहिले तर महिलांवर होणारे अत्याचार, त्यांना सामोरे जाव्या लागणार्या समस्या याचे प्रमाण एवढे वाढले आहे की, प्रत्येक पालकांना काळजी वाटू लागली आहे की आपली मुलगी व्यवस्थित असेल का? ती नको त्या प्रसंगाला सामोरे तर जावे लागणार नाही ना? कोणी तिला त्रास तर देत नसेल ना? असे अनेक प्रश्नांनी पालक त्रस्त असतात.
यासाठी अनेक गोष्टी जबाबदार असतीलही पण मला वाटते तंत्रज्ञान सुद्धा तेवढेच जबाबदार आहे. तंत्रज्ञानामुळे समाज इंटरनेटशी तर जोडला गेलाच शिवाय त्याच इंटरनेटचा वापर नको त्या कारणांसाठी सुद्धा व्हायला लागला.
सांगायचेच झाले तर काही इंटरनेटवरील गोष्टी पाहून पुरुष अगदी तसेच विचार करायला लागतात व याचा फरक पडतो तर त्यांच्या मानसिकतेवर. कारण पुरुषप्रधान देशात महिलांना कमी न समजण्याची कुठे सुरुवात झाली तोवर या कारणांमुळे पुरुषी मानसिकता पुन्हा बदलू लागली.
पुरुष पुन्हा एकदा महिलेला एक सुंदरता आणि वासनेची मूर्ती म्हणून पहायला लागला व स्वतःचे पुरुषत्व कशात असते हे विसरू लागला. असे म्हणतात की ‘सुंदरता हा महिलेचा दागिना आहे’. पण हाच दागिना तिच्यासाठी शाप ठरत असल्याचे पहायला मिळते. कारण पुरुषांची मानसिकतेची पातळी एवढी खालावली की, स्त्रीचे रक्षण करणे हे पुरुषत्वाचे लक्षण असते हेच तो विसरला.
पुरुषत्व सिद्धच करायचे असेल तर प्रत्येक समाजातील स्त्रीचा आदर सन्मान करून सिद्ध करावे. नाहीतर नुसतेच महिला दिन ,मदर्स डे अशा ठराविक दिवशीच त्यांच्याबद्दलचा आदर दाखवायचा व दुसर्याच दिवशी मुलीकडे पाहताना तीला स्वतःला लाज वाटेल एवढ्या वाईट नजरेने पहायचे. हेच पुरुषत्व आहे का? स्त्री ही समाजातील एक महत्वाची पैलू नाही का? ती फक्त सुंदरतेची व वासनेचीच मूर्ती आहे का? तुमची मानसिकता एवढ्या खालच्या पातळीवर जाणार आहे का? तिच्याबाबतीत आपण चांगले शब्दही वापरू शकत नाही का? ज्या देशात स्त्रीने अगदी सुरुवातीपासून पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन साथ दिलीय तिच्याबाबतीत आपण कसे वागतोय?
मला वाटते या सगळ्याचा विचार करून आपले पुरुषत्व दाखवून द्या व प्रत्येक महिलेचा आदर सन्मान करा तेही कृतीतून 🙏
शेवटी स्वतःलाच एकदा प्रश्न विचारून पहा
“तुम्ही पुरुषच का? ” उत्तर तुम्हीच शोधा 🙏