वाह ताज …..

आज खूप दिवसांनी ब्लाॅग लिहावासा वाटला. प्रवासवर्णन शब्दात मांडण्याचा एक प्रयत्न 🙏🏻

काही दिवसांपूर्वी ताजमहाल पहायला जायचा विचार मनात आला. मित्राला बोलताच तोही फिरायला जाण्यासाठी तयार झाला.तसं आजकाल कामात एवढा व्यस्त असतो की, जवळच्या तसेच घरच्यांना निवांत काॅल करून बोलायचं म्हटलं तरी वेळ काढावा लागतो.

याच व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सुट्टीच्या दिवशी आग्र्याला जायचा प्लॅन केला. पण ते म्हणतात ना की, कावळा बसायला अन फांदी तुटायला गाठ पडते. तसंच ज्या दिवशी आम्ही जायचं ठरवलं त्याच दिवशी सकाळी साईटवर मला व मित्राला जायला बाॅसने सांगितले.पण ‘जो जुगाड करणार नाही तो सिव्हिल इंजिनिअर काय कामायचा’.

शनिवारी नाईट शिफ्ट करून आलेल्या मित्रांनाच सकाळी झोपेतून उठवून आम्ही पाठवले व अगदी शेवटच्या काही मिनिटात स्टेशनला पोहोचून ट्रेनमध्ये बसलो.कारण आम्हाला माहित होते की, हा प्लॅन जर कॅन्सल करावा लागला तर नंतर आम्हाला आवर्जून जाण्यासाठी वेळ भेटणार नाही.शेवटी एकदाचं ट्रेनमध्ये बसलो आणि सुस्कारा सोडला.

तसं आम्ही बसलेल्या स्टेशनपासून ते आग्रा प्रवास ३.३० तासांचा प्रवास होता पण भारतीय वेळापत्रकानुसार त्यात भर पडली व आम्हाला पोहोचायला दुपारी १.३० वाजले. तिथे पोहोचताच रिक्षावाल्यांनी घेरा घातला. “चलो सर ताजमहल देखने सिर्फ बीस रूपये “. पण आम्हाला भुक लागलेली त्यामुळे सगळ्यात अगोदर जेवन करायचं ठरवलं. एका रिक्षावाल्याने आम्हाला सांगितले की तो दिवसभर आग्रामधील सर्वच स्पाॅट तुम्हाला फिरवून आणेल व रात्री स्टेशनला सोडेल. आम्हीही तयार झालो पण त्याला अगोदर जेवनासाठी अगोदर एखाद्या हाॅटेलला घेऊन चल म्हणून सांगितले.

रिक्षावाला त्याच्या ओळखीच्या हाॅटेलला घेऊन गेलो. त्या हाॅटेलमध्ये आम्ही बसलेल्या टेबलच्या आसपासचे तीन-चार टेबलवर तर मराठीच माणसे होती.ज्यावेळी तुम्ही असे कुठे फिरायला जाता आणि आपली माणसे भेटतात त्यावेळेस खरंच खूप मस्त वाटते.थोड्याच वेळात तिथे एका महिलेचा हाॅटेलच्या मालकाशी वाद चालू झाला. आम्ही टेबलला बसून पाऊनतास होऊन गेला होता. एवढ्यात वेटरने फक्त भाज्या आणि एकवेळेसच रोटी आणून दिल्या होत्या. सिव्हिल फिल्डमध्ये असल्यामुळे लगेच राग येण्याची व तो लगेच जमेल तसा व्यक्त करण्याची सवय झालीय.

त्या हाॅटेलच्या मालकासोबत आमचीही भांडणं चालू झाली. आम्ही बाहेर येऊन रिक्षावाल्यावर राग काढला. तिथेच आमचा मूड एवढा ऑफ झाला होता आणि एवढं रागात होतो की रिटर्नसुद्धा यावं म्हटलं पण नंतर आलोय तर ताजमहाल तर बघून जावं म्हटलं. रिक्षावाल्याने आम्हाला वेस्ट गेटला सोडले व आम्हाला ताजमहाल पाहण्यासाठीचा मार्ग व प्रोसेस सांगितली.

मी व एक मित्र तिकिट काढण्यासाठी गेलो व दोघांना रांगेत उभे रहायला सांगितले. बाहेरील गेटची रांग पूर्ण केली व आम्ही ताजमहालच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो

मुख्य प्रवेशद्वारावरील शिल्पकला पाहताच तुम्हाला समजते की, जगातील सात आश्चर्यांमध्ये ताजमहालचा समावेश का केला असावा.

मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच तुम्हाला डोळे दिपून टाकणारी वास्तू दिसते … ती म्हणजे….

ताजमहाल. 😍

ताजमहालची वास्तू पाहतानाचा क्षण खरंच डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा होता.ताजमहालच्या वास्तूसमोरील जे कारंजे आहेत त्यांच वैशिष्ट्य म्हणजे त्यांना पुरवलं जाणारं पाणी एकाच कलशमधून पुरवलं जातं व सगळे कारंजे एकाच वेळी चालू होतात. त्यामध्ये कोणतीही आधुनिक तंत्रशैली वापरलेली नाही. आम्ही अर्धाभर तास फिरल्यानंतर आम्हाला समजले की मुख्य वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी लागलेली रांग प्रवेशद्वारापाच्याच उजव्या बाजूला आहे. रांगेत तुम्हाला पांढरे शुज कव्हर घ्यावे लागतात.त्याचा वापर मुख्य वास्तूच्या आवारात करावा लागतो. ताजमहालचा रंग काळपट पडत असल्यामुळे घेण्यात येणारी ही काळजी असावी असे मला वाटते.

ताजमहालची सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याचा पाया जो बांधण्यात आला त्यामध्ये लाकडाचा वापर केला गेलाय व तो एवढ्या वर्षांनंतर सुद्धा आहे तसा आहे. ताजमहालविषयी जास्त माहिती तुम्ही युट्युब वरूनही घेऊ शकता 😆

आमची खरी परीक्षा तर आत्ता चालू झाली होती. देशातीलच नव्हे तर परदेशातूनही आलेले हजारो पर्यटकांची लागलेली भलीमोठी रांग. रांगेत सेल्फी काढणार्यांना मागे टाकत पुढे जाण्यात वेगळीच मजा येते 😉 एक कुटुंबाला मागे टाकल्यावर त्या माणसाने मला माझ्या तश्या वागण्याविषयी मला विचारले असता मी सांगितले “आप और आपकी फॅमिली फोटो खींचते रहे ,हम ताजमहल देखने आये है और लाईन मे आप की वजह से देर तक हम खडा नही रह सकते” त्या माणसाचे व त्यांच्या मुलीचं तोंड बघण्यासारख झालं होत.

रांगेत वास्तूच्या जवळ दोरीने नागमोडी वळणे करत रांग वळवलेली असते. एवढ्या हजारो लोकांसमोर सुद्धा दोरीच्या खालून वाकून पळत जाऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करणारे बालिश लोक बघितल्यावर खरंच सगळ्यांना हसू आवरत नाही. पोलीस परत त्यांना रांगेतून बाहेर काढण्याचं दृश्य आणि त्यांचे निरागस झालेले चेहरे. हसू आल्याशिवाय राहत नाही. हे फक्त आपल्याच देशात होऊ शकतं 😆

जवळपास दोन-अडीच तास रांगेत उभे राहून आम्ही मुख्य वास्तूमध्ये प्रवेश केला. आत गेल्यावर राणी मुमताजच्या समाधीचे दर्शन होतं

खरंतर आतमध्ये फोटो काढण्यास बंदी आहे आपण असे नियम अंमलात आणेल तो भारतीय कसा 😉

ताजमहालच्या मुख्य वास्तूजवळ फोटोसेशन करण्यातच आम्हाला संध्याकाळ झाली व आग्रा किल्ला तसेच इतर प्रेक्षणीय स्थळ पाहण्याच नियोजन आम्हाला कॅन्सल करावं लागल.

शेवटी स्टेशनला परतत असताना रिक्षावाल्याने आग्र्याच्या किल्यासमोर असणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी नेले. कारण त्याला आम्ही अगोदरच सांगितले होते की आम्ही महाराष्ट्रीयन आहोत.महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन दर्शन घेताना नेहमीप्रमाणेच गर्वाने छाती भरून येते.

पण आश्चर्याची गोष्ट ही होती की,महाराजांचा पुतळा जिथे आहे तिथे प्रकाशदिवे नव्हते किंवा एकही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. रिक्षावाल्याशी बोललो असता त्याने सांगितले की,”सर यहा शिवसेना के बहुत कार्यकर्ता है वे या फिर विधायक चाहे तो हो सकता है”

आम्हाला परत येतानाची ट्रेन पकडायची होती व वेळ कमी होता. आम्ही घाईघाईतच स्टेशनला पोहोचलो व शेवटच्या ट्रेनने परत आलो.

पण अजूनही मनात विचार येतो की, ज्या वेळेस नंतर आग्र्याला जाईन त्यावेळी महाराजांच्या पुतळा आहे त्या ठिकाणी प्रकाशदिवे लावण्यात यावे व एकतरी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावा.

शेवटी मध्यरात्री आम्ही परत पोहोचलो व ठरवलेला आग्रा प्लॅन यशस्वी झाला.

आयुष्यात किमान एकदातरी पहावी अशी वास्तू म्हणजे… ताजमहाल.

ताजमहाल फक्त शहाजहान आणि मुमताजच्या प्रेमाचं प्रतीक नाही तर अदभुत वास्तूकलेचा एक सुंदर नमुना आहे.

धन्यवाद 🙏🏻

गिनीज कलाकंडलम हेमलता

केरळ…

सध्या सर्वत्र केरळमधील भयानक स्थितीबाबत हेडलाईन्स पहायला मिळतायत. लवकरात लवकर तेथील लोकांचे जनजीवन पूर्ववत व्हावे ही इच्छा. 🙏

पण त्याच केरळमधील एका महिलेने कसे तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये कोरले त्याविषयी थोडेसे…

कलाकंडलम हेमलता. ..

कदाचित हे नाव तुमच्यासाठी नवीनच असेल पण हेच नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये आहे.

त्याचे कारण आणी त्यांच्याविषयी थोडीशी माहिती देण्याचा माझा एक प्रयत्न.

वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षीच त्यांना नृत्य शिकण्यासाठी एका नृत्य शाळेत टाकण्यात आले. त्यांच्या घरी कलांना वाव देणारे वातावरण होते. खासकरून नृत्य कलेला.


त्यासाठी त्यांनी १५ व्या वर्षी केरळ कलाकंडलम मध्ये प्रवेश घेतला.

भरतनाट्यम सोबतच त्यांना मोहिनीअट्टम ची सुद्धा आवड होती.

पण त्यावेळी बहुतेक त्यांनाही माहित नसेल याच नृत्य कलेमुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये पोहोचेल.

त्या मोहिनीअट्टम या नृत्य प्रकारात पारंगत झाल्या व दिनांक २० डिसेंबर ते २६ डिसेंबर २०१० असे सलग १२३ तास १५ मिनिटे सलग मोहिनीअट्टम नृत्य करून त्यांनी स्वतःचे नाव जागतिक पातळीवर पोहोचवले.

ज्यावेळी त्यांनी हा जागतिक विक्रम प्रस्थापित केला त्यावेळेस त्या बेशुद्ध होऊन पडल्या होत्या. पण सुदैवाने त्यांना लवकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

ज्यावेळी त्यांनी हा विक्रम केला त्यावेळी त्यांचे वय ३७ वर्षे होते व त्या दोन मुलांच्या आई होत्या.

त्यांनी गिनीज रेकॉर्ड केल्यानंतर लोक त्यांना गिनीज कलाकंडलम हेमलता या नावाने ओळखू लागले.

हा रेकॉर्ड करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टात त्यांच्या पतीचीही भुमिका खूप महत्वाची होती.

त्यांनी कलाकंडलम यांना दिवसाचे एक टाईमटेबलच बनवून दिले होते त्यानुसारच त्यांचा डाएट, डेली वर्कआउट, रनिंग होत असे.

त्या ज्यावेळी केरळमधील इतर भागांमध्ये फिरत असत तेव्हा त्यांना दिसून आले की, समाजातील खासकरून स्त्रीया आणि लहान मुलांमध्ये नृत्यकलेविषयी जास्त जागरूकता नाहीये. तेव्हा त्यांनी स्वतः एक नृत्य स्कूल चालू केले व प्रत्येक वयातील स्त्रीयांना तसेच मुलींना प्रशिक्षण द्यायला चालू केले.

कलाकंडलम हेमलता यांनी कोची मॅरेथॉन दरम्यान २८ दिवस ८०० किलोमीटर प्रवास केलाय.

#कलामंडलम_हेमलता #व्यक्तीविशेष

अशाप्रकारे स्वतःच्या कलेच्या आधारावर जागतिक पातळीवर देशाचे नाव पोहोचवणाऱ्या कलाकंडलम हेमलता यांना सलाम 🙏

(गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड च्या नियमानुसार त्यांना दर तासाला ५ मिनिटांचा ब्रेक मिळत असे)

“तुम्ही पुरुषच का?”

आपला देश पूर्वीपासूनच पुरूषप्रधान देश आहे असे म्हटले जाते. पण आपण जर जुना इतिहास पाहिला तर त्यात वर्णन झालेल्या सर्व पुरुषांचे कार्यच त्यांचे पुरुषत्व सिद्ध करते.

निदर्शनास आणून द्यायचे झाले तर आपल्या इतिहासात कधीही महिलांवर पुरूषी अत्याचाराचे आपल्याच पुरूषांकडून झालेले दाखले पहायला मिळत नाहीत.आणि जर काही प्रकार झाले तर त्यावेळची शासनव्यवस्था किंवा राजेशाही अशा पद्धतीने चालवली जायची की, कोणताही पुरुष महिलांबाबत अत्याचार तर दूरच पण तसे विचारही करताना दहा वेळेस विचार करतील.

काळ बदलत गेला ,सामाजिक परिस्थिती बदलत गेली त्याचप्रमाणे समाजातील महिलांचे स्थान ही बदलत गेले. ‘महात्मा ज्योतिबा फुले’ व ‘सावित्रीबाई फुले’ या दोन व्यक्तींना समाजबदलाचे खूप श्रेय जाते. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे तर समाजात महिलांना ‘चूल आणि मूल’ सोडूनही त्यांचे अस्तित्व आहे याची जणू जाणीवच करून दिली. अगदी त्याचप्रमाणे महिलांनी सुद्धा स्वतःचे समाजातील स्थान निर्माण केले व आपल्या पुरूषप्रधान देशातही त्यांनी स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले. 

हळूहळू समाजानेही त्यांचे कार्य, त्यांचे समाजातील स्थान याचा स्वीकार केला व महिलांना समानतेची वागणूक मिळू लागली. समाजात महिलाही पुरूषांच्या बरोबरीने सहभागी होऊन स्वतःला सिद्ध करु लागल्या.

पण अगदी अलीकडच्या काळात जर आपण पाहिले तर महिलांवर होणारे अत्याचार, त्यांना सामोरे जाव्या लागणार्‍या समस्या याचे प्रमाण एवढे वाढले आहे की, प्रत्येक पालकांना काळजी वाटू लागली आहे की आपली मुलगी व्यवस्थित असेल का? ती नको त्या प्रसंगाला सामोरे तर जावे लागणार नाही ना? कोणी तिला त्रास तर देत नसेल ना? असे अनेक प्रश्नांनी पालक त्रस्त असतात.

यासाठी अनेक गोष्टी जबाबदार असतीलही पण मला वाटते तंत्रज्ञान सुद्धा तेवढेच जबाबदार आहे. तंत्रज्ञानामुळे समाज इंटरनेटशी तर जोडला गेलाच शिवाय त्याच इंटरनेटचा वापर नको त्या कारणांसाठी सुद्धा व्हायला लागला.

सांगायचेच झाले तर काही इंटरनेटवरील गोष्टी पाहून पुरुष अगदी तसेच विचार करायला लागतात व याचा फरक पडतो तर त्यांच्या मानसिकतेवर. कारण पुरुषप्रधान देशात महिलांना कमी न समजण्याची कुठे सुरुवात झाली तोवर या कारणांमुळे पुरुषी मानसिकता पुन्हा बदलू लागली. 

पुरुष पुन्हा एकदा महिलेला एक सुंदरता आणि वासनेची मूर्ती म्हणून पहायला लागला व स्वतःचे पुरुषत्व कशात असते हे विसरू लागला. असे म्हणतात की ‘सुंदरता हा महिलेचा दागिना आहे’. पण हाच दागिना तिच्यासाठी शाप ठरत असल्याचे पहायला मिळते. कारण पुरुषांची मानसिकतेची पातळी एवढी खालावली की, स्त्रीचे रक्षण करणे हे पुरुषत्वाचे लक्षण असते हेच तो विसरला.

पुरुषत्व सिद्धच करायचे असेल तर प्रत्येक समाजातील स्त्रीचा आदर सन्मान करून सिद्ध करावे. नाहीतर नुसतेच महिला दिन ,मदर्स डे अशा ठराविक दिवशीच त्यांच्याबद्दलचा आदर दाखवायचा व दुसर्‍याच दिवशी मुलीकडे पाहताना तीला स्वतःला लाज वाटेल एवढ्या वाईट नजरेने पहायचे. हेच पुरुषत्व आहे का? स्त्री ही समाजातील एक महत्वाची पैलू नाही का? ती फक्त सुंदरतेची व वासनेचीच मूर्ती आहे का? तुमची मानसिकता एवढ्या खालच्या पातळीवर जाणार आहे का? तिच्याबाबतीत आपण चांगले शब्दही वापरू शकत नाही का? ज्या देशात स्त्रीने अगदी सुरुवातीपासून पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन साथ दिलीय तिच्याबाबतीत आपण कसे वागतोय? 

मला वाटते या सगळ्याचा विचार करून आपले पुरुषत्व दाखवून द्या व प्रत्येक महिलेचा आदर सन्मान करा तेही कृतीतून 🙏

शेवटी स्वतःलाच एकदा प्रश्न विचारून पहा 

“तुम्ही पुरुषच का? ” उत्तर तुम्हीच शोधा 🙏

सोहऽशल मिडिया!

आज नवीन व सर्वांचा आवडता विषय मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय.

या ब्लॉगच्या सुरुवातीला एक किस्सा सांगावासा वाटतो तो असा, पहिला ब्लॉग लिहिल्यावर सर्वांनी कौतुक केले कोणी चुका सांगून मला त्या टाळता याव्यात याविषयी सांगितले.पण एकाने मला विचारले की, ” ब्लॉग तर काल्पनिक किंवा कथा याप्रमाणे असतात तू तर तुझ्या वैयक्तिक मतांविषयी लिहितोय”. मी म्हटले की,”ब्लॉग कसे लिहतात ते मला जरी जमले नाही तरी चालेल पण लोकांपर्यंत माझे म्हणणे मांडण्याचा मी प्रयत्न करतोय,तो ही जिवंत आणि महत्वाच्या विषयांवर एवढेच.”

या विषयाला असे नाव देण्याचे कारण म्हणजे सोशल मिडिया मानवनिर्मित असूनही आजकाल तो आपल्यालाच सहन होत नसल्याचे माझ्या निदर्शनास आलेय.

सोशल मिडिया ही सुरुवातीला डिजीटल युगातील सर्वात महत्वाची आणि मोठी क्रांती मानली गेली. कारण यामुळेच की काय हजारो किलोमीटर अंतरावर असूनही माणसे एकमेकांना जोडली जाऊ लागली व एकमेकांशी कनेक्ट झाली. त्याचा फायदा असाही झाला की माणसांच्या नवीन ओळखी निर्माण होऊ लागल्या, एकमेकांच्या जीवनशैली,विचार शेअर करता येऊ लागले. यामुळे झाले असे की, लोकांची सोशल मीडियाकडे कूच वाढू लागली व त्याचा वापर वाढू लागला. एकामुळे दुसरा, दुसर्‍यामुळे तिसरा असे अनेक लोक सोशल मिडियाशी जोडले गेले. त्याचा फायदा , आनंद, उपयोग लोक करून घेऊ लागले

आपल्या आवडीनिवडी,  आपले मत मांडण्यासाठी सोशल मिडिया हे माध्यम बनले आणि त्याचा वापर वाढतच गेला. तो सध्या पाहता जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचलाय.आणि त्याचा उपभोग, आनंद लोक घेऊ लागले.

पण ते म्हणतात ना की ‘अति तिथे माती ‘ असे काहीसे व्हायला वेळ लागत नाही. सोशल मिडियाचा जसजसा वापर वाढला तसेच त्याचा अतिरेक ही व्हायला लागला आणि माणसाने या सुरूवातीला काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टींचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध लावायला चालू केले. खाजगी जीवनसुद्धा त्याच्याशी जोडले गेले. सुरुवातीला विचारांची देवाणघेवाण करताना आनंदात वाटणाऱ्या माणसांमध्ये मतभेद मांडताना मात्र वैयक्तिक मतभेदांची जागा वादाने घेतली.

कोणीतरी आपल्याला सोशल मिडिया सारख्या काल्पनिक जगात जरी कोणी काही बोलले तरी आपण त्याचा थेट प्रत्यक्ष जीवनात काही परिणाम होणार आहे का?  प्रत्यक्ष जीवनाचा त्याच्याशी किती संबंध आहे? सोशल मिडियावर वादविवाद घालून कोणती गोष्ट साध्य होणार आहे का? ज्या गोष्टींसाठी आपण त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे तसे होते का? कोणत्या गोष्टींना किती महत्व द्यायचे? असे अनेक प्रश्न निर्माण व्हायला लागले.

सध्या सर्वात जास्त वादाचे कारण ठरणाऱ्या गोष्टी म्हणजे कोणीतरी महान पुरूषांबद्धल, राजकीय व्यक्तींबद्दल तसेच जे महान किंवा मोठे लोक आहेत त्यांच्याबद्दल अपमानास्पद किंवा अपशब्द वापरून पोस्ट टाकणे. पण तसे पाहिले तर त्या एका पोस्टने त्या व्यक्तिंचे महानत्व कमी होणार आहे का? बर जरी आपण त्यातून वाद घातले,दंगल किंवा जाळपोळ घडवून आणल्या तर त्याचा परिणामही आपल्यालाच भोगायचे आहेत? त्यातून काय आणि गोष्टी साध्य होतात? अशा अनेक प्रश्नांबद्दल आपण विचार करतो का?  

जर तसा योग्य विचार केला तर मला नक्कीच वाटते की, आपण अशा पोस्ट किंवा शब्द वापरताना नक्कीच एकदा तरी विचार करू.

ज्या सोशल मिडिया चा वापर सुरुवातीला वैयक्तिक विचारांशी होता तोच पुढेपुढे जाऊन त्याची जागा राजकारण,जातीयवाद,श्रेष्ठत्व यांसारख्या गोष्टींनी घेतली व यातून वाढत गेले ताणतणाव व वाद.

वाद घालणे किंवा एखाद्याला त्रास देणे एवढे सोप्पे होऊन बसले की कोणतीही ओळख न वापरता, कोणतेही नाव वापरून, पाहिजे तसे शब्द वापरता येऊ लागले. त्याचा परिणाम असाही दिसून येतो की मानसिक रोगांचे निर्माण व्हायला वेळ लागला नाही. व ज्याचा फायदा माणसांना व्हावा या हेतूसाठी मानवानेच बनवलेल्या ‘सोशल मिडिया’ ने त्याची जागा माणसासाठीच त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टीची घेतली.

आपण जेवढे सोशल मिडिया च्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेलो तेवढेच त्याचे एक विश्व निर्माण होऊ लागले. आपणाशी सोशल मिडियावर बोलणारी व्यक्ती प्रत्यक्ष जीवनात कशी असेल हे माहित नसतानाही आपण त्याची एक काल्पनिक इमेज बनवायला लागलो. त्या माणसाने वापरलेले ठराविक शब्द, त्याने मांडलेल्या काही गोष्टी यावरूनच आपण त्या व्यक्तीबद्दल मत निर्माण करून त्या व्यक्तीविषयी एक काल्पनिक का असेना पण तसेच विश्व निर्माण करू लागलोय. मग ती व्यक्ती प्रत्यक्षदर्शी कशीही असो आपल्याला त्याच्याशी काहीच देणेघेणे नसते.

हल्ली सर्वात जास्त चर्चेचा विषय म्हणजे ‘सोशल मिडिया वापरावा की वापरू नये’ यावर मी माझे मत असे सांगेन की, मी जे मुद्दे मांडलेत ते तुम्हाला पटो किंवा न पटो पण मी तुमच्यापर्यंत सोशल मिडिया मार्फतच पोहोचवलेत एवढे लक्षात घ्या.

सोशल मिडिया विषयीचे माझ्याकडे असलेले सर्व मुद्दे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलाय, अपेक्षा यावर तुम्ही नक्कीच विचार कराल 🙏

Twitter :@DnyaneshwarGk7 

मो.नं  +919921846483

‘भारतीय स्पोर्ट्सची अवस्था’

नमस्कार, हा माझा पहिलाच ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न 🙏

सुरुवातीला मी सांगू इच्छितो की या ब्लॉग मध्ये मी कोणत्याही  खेळाला कमी लेखत नाहीये, फक्त एक बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय . मी स्वतः क्रिकेट,फुटबॉल, खो-खो, अॅथलेटिक्स चा खेळाडू होतो त्यामुळे कोणत्याच खेळाचा अपमान मी करू शकत नाही.

आपल्या १२५ करोड लोकांच्या देशाला जागतिक स्तरावरील खेळाच्या स्पर्धेत, एक-एक पदक मिळवण्यासाठी झगडावे लागतेय.याहून दुर्दैवी गोष्ट कोणतीच नाही असे वाटते.कारण आपल्या पेक्षा कमी लोकसंख्या असलेले, कमी प्रगत असलेले देश सुद्धा आपल्या पेक्षा पदकाच्या संख्येत पुढे असतात. 

क्रिकेट हा आपल्याकडील सर्वात प्रिय खेळ. पण तेवढेच महत्व आपण इतर खेळांना देतो का? जो खेळ फक्त बोटावर मोजता येतील एवढे देश खेळतात त्यात आपण पुढे, पण आपल्याच राष्ट्रीय खेळ ‘हाॅकी’ ची आजची स्थिती काय आहे? .मेजर ध्यानचंद यांनी ज्या हॉकीला सातासमुद्रापार नेले त्यांना सचिन तेंडुलकर प्रमाणे ‘भारतरत्न’ मिळाला का?ऑलिम्पिक स्पर्धेत आपला देश एवढा मागे का? असे खूप प्रश्न निर्माण होतात.

याबाबतीत मी कोणालाही दोष देण्यापेक्षा लोकांच्या मनस्थितीला दोष देईन. कारण आपण जर युरोपियन किंवा अमेरिकन देश पाहिले तर त्या लोकांची मनस्थिती अशी असते की ,जो खेळ कमी वेळात खेळला जाऊन जागतिक स्तरावर देशाचे नाव करेल असाच खेळ ते लोक करियर साठी निवडतात. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न लहानपणापासूनच चालू असतात. त्यांच्या घरचे, नातेवाईक त्यांना लहानपणापासूनच त्यासाठी प्रोत्साहन, मार्गदर्शन करतात. आपल्याकडे असे खूप कमी पाहायला मिळते.

‘स्वतःचे करिअर फक्त ठराविक गोष्टींमध्येच आहे’ असा विचार बदलून प्रत्येकाने स्वतःला, घरातील मुलांना, नातेवाईक यांपैकी कोणालाही  खेळामध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन किंवा मार्गदर्शन करावे. माझ्या मते जर आपण आपल्या मुलांना वैयक्तिक खेळांसाठी प्रोत्साहित करावे,कारण वैयक्तिक खेळ हा असा प्रकार आहे ज्यात  त्यांच्या कष्टाचे फळ स्वतःच मिळवता येते. आणि जे खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत त्या खेळात करिअर साठी मुलांना प्रोत्साहन करावे.

आजकाल उदय शंकर, नीता अंबानी असे बरेच लोक आहेत जे भारतीय स्पोर्ट्स साठी प्रयत्न करतायत त्यांना माझा सलाम.

सध्या आधुनिक युगात मुलांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहित करणे हे खरतर पालकांसाठी आव्हानच झाले आहे.  कारण डिजिटल युग म्हणता म्हणता तेच मैदानी खेळांसाठी शाप ठरत आहे त्यामुळे शेवटी एकच सांगावेसे वाटते की, आपल्या मुलांना खेळासाठी प्रोत्साहित करा, एक दिवस तेच तुमचे आपल्या, देशाचे नाव मोठे करणार आहेत. आणि अपेक्षा आहे एक दिवस आपल्या देशाचा खेळाच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण व्हावा व ऑलम्पिक सारख्या स्पर्धेत पदक यादीत उच्च स्थान गाठावे.🙏